पुणे -ग्रामविकास विभागाचे बनावट होमपेज तयार करून त्यावर नोकर भरतीची खोटी जाहिरात देऊन तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. यावरून बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संदीप कोहिणकर (रा. शनिवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. कोहिणकर हे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर 3 हजारपेक्षा अधिक पदांची भरती होणार असल्याची जाहिरात व्हायरल होत आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
हे अर्ज केवळ ऑनलाइन भरता येत असून त्यासाठी 500 रुपये शुल्क घेतले जात होते. ग्रामविकास विभागाने काढलेल्या ई-ग्रामपंचायत, आपल्या गावाची ओळख महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग सादरीकरण एप्रिल 2020 प्रकल्प ई-ग्राम पंचायत राज्यस्तरीय सरळ सेवा निवड समिती, पुणे ई-ग्रामपंचायत प्रकल्प भरती परिक्षा-2020 या जाहिरातींचा मेसेज पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आला होता. त्यांनी हा मेसेज तक्रारदार कोहिणकर यांना पाठवून त्याची शहानिशा करण्यासाठी सांगितले.
जाहिरातीबाबत मंत्रालयातील कक्ष अधिकारी, उप सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, अशी कोणतीही जाहिरात ग्रामविकास विभागाने काढली नसल्याचे त्यांनी सांगितले. या मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक केले असता ग्रामविकास विभागाचे होम पेज सुरू होते. मात्र, हे पेज बनावट तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ई-ग्रामपंचायत प्रकल्प भरती परीक्षा राबविण्यात येत असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची भरती परीक्षा जिल्हा परिषदेकडून घेण्यात येत नसून सोशल मीडियावर फिरणारे संकेतस्थळ ग्रामपंचायत विभागाचे नाही. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त संकेतस्थळावर आहे, अशी खोटी जाहिरात देऊन आणि महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे सादरीकरण एप्रिल 2020 असे होमपेज तयार करून त्या संकेतस्थळाचा उल्लेख करून शासनातर्फे भरती आहे, असे भासविण्यात आले आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद