पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक विभागातील गणित आणि विज्ञान विषयांच्या शिकविण्याची जबाबदारी मानधनावरील शिक्षकांवर आली आहे. आठ रिक्त पदांवर कायमस्वरूपी शिक्षकांची भरती अद्याप केलेली नाही. त्यांच्या जागी मानधनावरील शिक्षक भरती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय सध्या तरी टळली असली तरी कायमस्वरूपी शिक्षकांची भरती कधी होणार? असा प्रश्न उपस्िथत केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि आकलन क्षमतांच्या विकासासाठी गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय महत्त्वपूर्ण आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या विषयांची व शिक्षकांचे महत्व अधोरेखित केले आहे. मात्र या विषयांच्या शिक्षक भरतीकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केली आहे. राज्यातील शाळांमधील या विषयांच्या शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. या जागांवर लवकरच भरती केली जाणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. मात्र त्यामध्ये गणित आणि विज्ञान विषयक शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळेत ४२ हजार ७४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये १ हजार २५५ महापालिका शिक्षक विविध विषय शिकवित आहेत. यामध्ये आठ पदे विज्ञान पदवीधरची रिक्त आहेत.गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय हे शिक्षक शिकवत आहेत. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी महापालिका प्रशासनाला मानधनावरील शिक्षक नेमण्याची वेळ येत आहे. त्यांना किमान वेतनानुसार २५ हजार रुपये मानधन दिले जात आहे. शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलवर माहिती अद्ययावत केली जात आहेत. मात्र त्याची दखल घेऊन रिक्त पदे भरणार कधी, असा प्रश्न उपस्िथत होत आहे.
विज्ञान पदवीधरची सध्या आठ पदे रिक्त आहेत. मात्र त्या जागेवर आपण मानधनावरील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना शासनाच्या नियमांप्रमाणे किमान वेतन देत आहे. पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या माहितीबाबत कळविले आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका