दीड तासांनी मादीच्या कुशीत : आठवड्यात दुसरी घटना
मंचर – शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गोरडे मळ्यात शनिवारी (दि. ३०) सकाळी ऊस तोडणी सुरू असताना तीन बिबटे बछडे आढळून आले. वनविभाग व रेस्क्यू पथकाच्या सतर्कतेने अवघ्या दीड तासांत तीनही बछडे पुन्हा मादीच्या कुशीत विसावले. ही घटना कॅमेर्याकत कैद झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातील ही घटना घडल्याने गोरडे मळा शिंगवे परिसरात शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
गोरडे मळ्यात रोहिदास रंगनाथ गोरडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. नेहमीप्रमाणे सकाळीच ऊस तोडणीला सुरू असताना साडेसातच्या सुमारास तीन बिबट बछडे आढळून आल्याने ऊसतोड कामगारांनी ऊस तोडणीचे काम थांबवून भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ यांना घटनेची खबर दिली. वाव्हळ यांनी वनविभागाला बछडे आढळून आल्याची माहिती दिली.
मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दहा वाजता तीनही बछड्यांना ताब्यात घेऊन क्रेटमध्ये ठेवले आणि सव्वाअकराच्या सुमारास मादीने तीनही बछड्यांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलविले.
हे बछडे वीस ते पंचवीस दिवसांचे असल्याचे वनअधिकार्यां नी सांगितले. मागील आठवड्यात गुरुवारी (दि. २१) याच मळ्यात झुंबर गोरडे यांच्या शेतात उसतोड सुरू असताना तीन बछडे आढळून आले होते. आता पुन्हा तेथेच बछडे आढळून आल्याने गोरडे मळा, शिंगवे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.