पुणे – राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यंदा पहिल्यांदाच सुरू केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा परिषदेला १८२ नवे शिक्षक मिळाले आहेत. या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. आता येत्या आठवडाभरात या नव्या शिक्षकांना समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्तीचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या २७५ जागा रिक्त होत्या. यापैकी या भरतीतील पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने जिल्हा परिषदेला १८२ नवे शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या रिक्त जागांपैकी ९१ जागा अद्यापही रिक्तच आहेत.
गेल्या तब्बल बारा वर्षांपासून मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. आधी भरतीवर असलेली बंदी, तर ही बंदी उठल्यानंतर संच मान्यताच निश्चित न झाल्याने, शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. ही प्रक्रिया यंदा सुरू झाली असून, त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेला आणखी नवीन शिक्षक मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.