पुणे : वडगाव बुद्रुक येथील रघुनंदन हॉल येथे चेस लवर्स ग्रुप तर्फे, पुणे जिल्हा चेस सर्कल च्या मान्यतेने एक दिवसीय जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या बुद्धिबळ स्पर्धेला सिंहगड रोड वरील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि आपुलकी संस्थेचे समीर रुपदे हे प्रायोजक लाभले होते. या स्पर्धेत 6 वर्षे ते 80 वर्षापर्यंत वयाच्या तब्बल 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग नोंदवला होता.
पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगावी, ठाणे, मुंबई तसेच गुजरात येथून खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत पुण्यात झालेली ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणुन ओळखली गेली. ही स्पर्धा खुली आणि 15 वर्षा खालील गटामध्ये खेळवली गेली. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विठ्ठलवाडी नगर कार्यवाह अनंत कुलकर्णी आणि विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष शरद जगताप तसेच इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केळकर यांनी तरुण खेळाडूंना बुद्धिबळातील भविष्यात येणार्या आव्हान विषयी मार्गदर्शन केले. खुल्या गटामध्ये प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे : प्रियांशू पाटील, बूमीनाथन आणि चेतन मुतगीकर. 15 वर्षा खालील प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे : तनिष्क ठक्कर, अलौकिक सिन्हा आणि वेदांत काळे
विविध गटामध्ये प्रथम विजेतेपद पटकावणारे खेळाडू पुढील प्रमाणे:
अदिती कयाल (महिला), उदय तेज सिंग (बिगर मानांकित), मनोज दामोदर (दिव्यांग), लक्ष्मण खुडे (वरीष्ठ), शर्विन बडवे (12 वर्षा खालील), शितीझ प्रसाद (10 वर्षा खालील), आद्विक अग्रवाल (8 वर्षा खालील).
यावेळी खेळाडूंना सिंहगड रोड, आनंद नगर भागातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद पाटणकर, पराग आपटे, आदित्य सहस्रबुद्धे, रोहन कानिटकर, नचिकेत बदनोरे, श्रद्धा बदनोरे, पलसुले यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत रु. 44,400/- ची एकूण 46 बक्षिसे स्मृतिचिन्ह सहित देण्यात आली. याव्यतिरिक्त आयोजकांतर्फे भाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूस प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चेस लवर्स ग्रुप तर्फे सचिन खेर, सुयश पाटणकर, विनोद भुतडा, विशाल गावडे, अनिरुद्ध मस्तुद, शोभराज उत्पात, सांची खेर, पराग राठी, सुकृत रायते, रवींद्र सुपेकर, अथर्व कूबेजकर आणि संकेत यादव यांनी मेहनत घेतली.