वॉशिंगटन : साधारणपणे कोणत्याही श्वानाचे आयुष्य 10 ते 13 वर्षे असते पण अमेरिकेतील एक श्वान एकविसाव्या वर्षीही अद्याप तंदुरूस्त असून त्याच्या या दीर्घायुष्यामुळे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. गिसेला शोर नावाच्या एका महिलेने 21 वर्षापूर्वी हे कुत्रे पाळण्यासाठी घेतले होते 21 वर्षांनंतरही हा श्वान तंदुरुस्त असून नेहमीपेक्षा दुप्पट आयुष्य जगण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.
चिवावा जातीचा हा श्वान मेक्सिकोतील याच नावाच्या एका राज्यावरून ओळखला जातो हा श्वान अतिशय छोटा असून त्याचे वजनही दीड ते दोन किलो एवढे कमी असते. गिसेला नावाच्या या महिलेकडे अनेक कुत्री असून त्यापैकी सर्वात दीर्घकाळ तिच्या सोबत राहणारे हे टोबिकिथ नावाचेच कुत्रे आहे गिसेला आपल्या पाळीव प्राण्यांना प्रोटीन युक्त आणि पौष्टिक आहार देते त्याशिवाय ती पाळीव प्राण्यांची अतिशय काळजी घेते.
टोबिकिथच्या दीर्घायुष्याबाबत बोलताना गिसेला म्हणते त्याला झोपण्याची अतिशय आवड आहे. बराच वेळ तो झोपुनच असतो कदाचित हेच त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे त्याशिवाय तांदुळाचा भात खाणे आणि पालेभाज्या खाणे ही त्याला आवडते त्याला फिरायलाही आवडत असून इतर सर्वांसोबत तो दंगामस्ती करत असतो अशी माहितीही गिसेलाने दिली आहे. 21 वर्ष 66 दिवस वयाच्या टोबिकिथची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्यानंतर गिनीजने इंस्टाग्रामवर त्या विक्रमाची माहिती प्रसारित केली त्यानंतर लाखो लोकांनी त्या माहितीला लाईक केले आणि टोबिकिथला शुभेच्छा दिल्या.