विशेष मोहिमेत शहरात सुमारे 34,477 किलो कचरा संकलित
पुणे – शहरात रविवारी झालेल्या “पुणे प्लॉगेथॉन 2022′ मेगा ड्राईव्ह अंतर्गत एकूण 1,53,198 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून पुणे शहराने केली एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रमी नोंद केल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 1,36,294 नागरिकांनी प्लॉगेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आपले ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते.
महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयातर्गत एकूण 134 रस्ते, विविध वारसा स्थळे, शहरातील एकूण 45 उद्याने, टेकड्या, पुणे शहरातील विविध नदी घाट इ. ठिकाणी “प्लॉगेथॉन ड्राइव्ह’ राबवण्यात आला.या उपक्रमाची सुरूवात महापालिकेच्या मुख्य इमारतीतून करण्यात आली. यावेळी कॉन्सुलेट जनरल ऑफ स्वीडन इन महाराष्ट्र ऍन्ड गोवाचे ऍना लुटविक, खासदार ऍड. वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विलास कानडे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, “यशदा’चे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयक आशा राऊत आदी उपस्थित होते. तसेच सिने अभिनेत्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला.
या संपूर्ण उपक्रमांतर्गत 29,870 किलो प्लॅस्टिक कचरा, 753 किलो ई कचरा व 3,854 किलो इतर कचरा असा एकूण 34,477 किलो कचरा संकलित करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता भिडे पूल येथे झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. खेमनार यांनी प्रास्ताविक केले.
दरम्यान, प्लॉगेथॉन ही मूळची स्वीडीश संकल्पना असून, ती संपूर्ण जगाने स्वीकारल्याचे मत ऍना लुटविक यांनी व्यक्त केले. सुळे यांचे हस्ते एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मेडल आणि प्रमाणपत्र डॉ. खेमनार यांना प्रदान करण्यात आले.