बेलग्रेड – जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोवीचने आगामी काळात ग्रॅण्डस्लॅम टेनिसची विक्रमी विजेतेपदे मिळविण्याचे लक्ष्य असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गेल्या मोसमात सातत्याने स्पर्धा खेळाव्या लागल्या तरीही तंदुरुस्तीसाठी मी जागरुक आहे. सध्या करोनामुळे ज्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत तसेच पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्या एकदा सुरु झाल्या की पुन्हा एकदा सातत्याने सामने खेळावे लागतील. त्यामुळे सरावाबरोबरच तंदुरुस्ती देखील महत्त्वाची ठरेल. सध्या वैयक्तिक सरावाला परवानगी मिळाली असली तरीही सराव सामनेही खेळायला मिळाले पाहिजेत तरच आगामी स्पर्धांसाठी पूर्ण सज्ज होता येईल. आता पुढे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत सरस खेळ करणार आहे. मात्र, ग्रॅण्डस्लॅमच्या विजेतेपदांचा विक्रम साकारण्याचेच प्रमुख लक्ष्य आहे, असेही जोकोवीचने सांगितले.
रॉजर फेडरर व राफेल नदाल या समकालिन बलाढ्य टेनिसपटूंचे वर्चस्व मोडून काढत क्रमवारीत आपला दबदबा निर्माण केला आहे. आजवर जोकोवीचने 17 वेळा ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररच्या नावावर 20 तर, स्पेनच्या राफेल नदालच्या नावावर 19 विजेतेपदे आहेत. नदालला मागे टाकण्यासाठी 3 तर फेडररला मागे टाकण्यासाठी 4 विजेतेपदे मिळविण्याचे जोकोवीचसमोर आव्हान आहे.
करोनामुळे जागतिक क्रीडा क्षेत्राला खिळ बसलेली आहे. मात्र, त्यापूर्वी जोकोवीचने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. हे त्याचे ऑस्ट्रेलियन ओपनचे आठवे विजेतेपद ठरले होते. आता करोनाचा धोका कमी झाला किंवा संपुष्टात आल्यावर सुरु होणाऱ्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे जोकोवीचने सांगितले आहे.