मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच पाकिस्तानी कलाकारांना विरोध राहिलेला आहे. कलाकारांसह पाकिस्तानी गायकांनी बॉलिवूडमध्ये न गाण्याचा इशारा देखील मनसेकडून अनेकदा देण्यात आला आहे. पाकिस्तान कलाकारांना बॉलिवूडमधून हद्दपार करण्यासाठी मनसेने कित्येक आंदोलन देखील केली आहेत. अशात आता पुन्हा एकदा मनसेकडून पाक सिंगर अतिफ अस्लमला बॉलिवूडमध्ये घेऊन दाखवाच असा इशारा निर्मात्यांना दिला आहे. अमेय खोपकर यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून त्यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे.
पोस्टमध्ये खोपकर पुढे म्हणतात,”पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय”
अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.
विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव…— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 5, 2024
अतिफ अस्लमने ‘टायगर जिंदा है’ या सलमान खानच्या चित्रपटात शेवटचं गाणं गायलं होतं. त्यानंतर भारत-पाकिस्तानातील वाढत्या संघर्षामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात कला सादर करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवरील ही बंदी हटवली. त्यानंतर अतिफ अस्लम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशात अमेय खोपकर यांच्याकडून संताप व्यक्त करत मनसे स्टाईलने इशारा देण्यात आला आहे.