नवी दिल्ली – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे यांच्या पदोन्नतीची शिफारस केली आहे. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाला आणखी एक न्यायमूर्ती मिळण्याची शक्यता असून त्यांची नियुक्ती निश्चित झाल्यास न्या. वराळे हे सर्वोच्च न्यायालयातील तिसरे दलित न्यायाधीश असतील.
न्या. भूषण गवई आणि न्या. सी. टी. रवीकुमार हे दोन दलित न्यायाधीश आहेत. न्या. भूषण गवई हे 2025मध्ये मे ते नोव्हेंबर या कालावधित सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील. सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयात तीन दलित न्यायाधीश असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
61 वर्षीय न्यायमूर्ती वराळे हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवीधर आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ दिवाणी, फौजदारी, कामगार आणि प्रशासकीय बाबींमध्ये कायद्याचा सराव केला आहे. ते यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
ऑक्टोबर 2022मध्ये त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते सध्या उच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आणि अनुसूचित जातीतील एकमेव मुख्य न्यायाधीश आहेत. न्या. वराळे हे न्या. एस. के. कौल यांची जागा घेतील. न्या. कौल यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. न्या. वराळे यांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायाधीशांचे पूर्ण मंजूर संख्याबळ असेल.