आरोग्य सभापती अजय माळवे यांनी मांडला ठराव
फलटण नगर परिषद विशेष सभेत विविध विषयांवर चर्चा
फलटण – आषाढी वारी दरम्यान फलटण शहरात येणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे स्वागत आणि सोहळ्यातील वारकरी व भाविकांना द्यावयाच्या विविध सेवा, सुविधांच्या सुमारे 13 लाख रुपये अपेक्षित खर्चाच्या निविदा काढण्याच्या आरोग्य सभापती अजय माळवे यांनी मांडलेल्या ठरावास फलटण नगर परिषद विशेष सभेत एकमताने मान्यता देण्यात आली.
फलटण नगर परिषद विशेष सभा आज (शुक्रवार) श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे होत्या. सभेस उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक / नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांचे सहकारी अधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्षा निताताई नेवसे यांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची फेरनिवड झाल्याबद्दल आणि सातारा व माढा लोकसभा मतदार संघातून अनुक्रमे खा. उदयनराजे भोसले व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला तो सभागृहाने एकमताने मंजूर केला. अशोक जाधव यांनी दोंन्ही नवनिर्वाचीत खासदार यांचा नगरपरिषदेच्यावतीने यथोचित जाहीर सत्कार करण्याची मागणी केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहोळ्याच्या आषाढी वारी दरम्यान येथील वास्तव्यात विमानतळावरील पालखी तळावर दर्शनबारी, विद्युत प्रकाश योजना, चौकशी कार्यालय, दवाखाना, स्वागत कमानी, तात्पुरती शौचालये, पालखी तळावर दिंडीचे ठिकाणी आलबेली ठिकरी व तळ स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी करणे, शहरातील पालखी मार्गाची स्वच्छता, दुरुस्ती, पॅचवर्क, फिरते शौचालयाचे ठिकाणी विद्युत व्यवस्थेसाठी जनरेटर पुरविणे आणि वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वरीलप्रमाणे सुमारे 13 लाख रुपये अपेक्षित खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सोहळ्याच्या वास्तव्या दरम्यान दुर्दैवी घटना टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेणे तसेच पालखी तळ आणि शहरात अग्निशमन दल सज्ज ठेवणे, वीज, पाणी, आरोग्य वगैरे सुविधा केवळ पालखी तळावर न देता शहरात ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या प्रत्येक ठिकाणी या सुविधा द्याव्यात अशी मागणी सभेत करण्यात आली, त्यालाही एक़मताने मान्यता देण्यात आली. सर्व समाजमंदिरे व सामाजिक सभागृह नगर परिषदेने ताब्यात घेवून त्यावर नगर परिषदेच्या नावाचे फलक लावावेत प्रसंगी त्याचा वापर कसा कोणी करावा याची नियमावली तयार करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्याबाबत नगराध्यक्षांनी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले. सभागृहातील या चर्चेत नगराध्यक्षा सौ. नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, ऍड. मधुबाला भोसले, अजय माळवे वगैरेंनी आपली मते मांडली.