मुंबई – ओमायक्रॉनची कमी झालेली भीती आणि रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या उदार पतधोरणामुळे सरलेल्या आठवड्यात मुख्य निर्देशांकात दोन टक्क्यांनी वाढ झाली. रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक पाच टक्क्यांनी वाढला तर स्माॅल कॅपमधील 103 कंपन्यांच्या शेअरच्या भावात तब्बल 10 ते 50 टक्क्यांची वाढ नोंदली गेली.
दिवाळी दसऱ्यात घरांची विक्री वाढली आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉमुळे विकासकांच्या कामावर परिणाम झाला नसल्याचे क्रेडाई या संस्थेने म्हटले आहे. या कारणामुळे रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची सरलेल्या आठवड्यात जोरदार खरेदी झाली.
मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढल्यामुळे सरलेल्या आठवड्यामध्ये मिड कॅप दोन टक्क्यांनी तर स्मॉल कार तीन टक्क्यांनी वाढला. 103 कंपन्यांच्या शेअरच्या भावात 10 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामध्ये नेटवर्क 18 मीडिया, रिलायन्स कम्युनिकेशन्स, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी, 63 मूनस टेक्नॉलॉजीज, महानगर टेलिफोन निगम, रॅमके इन्फ्रास्ट्रक्चर, बीसीएल इंडस्ट्रीज आणि श्री रेणुका शुगर या कंपन्यांचा समावेश आहे.
रिअल्टी क्षेत्राबरोबरच धातू क्षेत्राचा निर्देशांक 4.7 टक्क्यांनी, भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 3.3 टक्क्यांनी वाढला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1090 अंकांनी वाढून 58,786 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 314 अंकांनी म्हणजे 1.82 टक्क्यांनी वाढून 17,511 अंकांवर बंद झाला.
तेजी- मंदीचा अंदाज
औद्योगिक उत्पादन आगेकूच करीत असल्याचे आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली. भारतातील महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर होईल. रिझर्व बॅंकेने अगोदरच उदार पतधोरण जाहीर केले आहे. मात्र अमेरिकेची महागाई वाढल्याचे आकडीवारी शनिवारी जाहीर झाल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. जर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री करण्याचा निर्णय घेतला तर निर्देशांक आठवड्याच्या सुरुवातीला कमी पातळीवर राहू शकतात.
रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, निफ्टीने 17,400 ची पातळी कायम राखणे गरजेचे आहे. कोटक सेक्युरिटीजचे विश्लेषक अमोल आठवले म्हणतात की, निफ्टीला 17,300 अंकावर चांगला आधार आहे. मात्र निफ्टीने 17, 000 पर्यंत आगेकूच केली तर पुढचा टप्पा 18,000 अंकांचा असू शकतो.