कोथरूड, दि. 2 (प्रतिनिधी) -चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री येणार म्हटल्यावर संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. एक चूक आणि बदली किंवा भविष्यात त्रासदायक ठरू शकते. या भीतीने मंत्र्यांना आमचे काम कसे झकास चालले, आम्ही किती तत्पर आहोत, हे दाखविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावरील सर्व खड्डे “एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी रात्रभर जागून बुजवले एका रात्रीत संपूर्ण चौक आणि रस्ता डांबरीकरण करून चकाचक केला. चांदणी चौकातील नवीन उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामाला 2018 मध्ये सुरवात झाली. करोनामुळे लॉकडाऊन परिस्थिती दोन वर्षे होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होती त्याकाळात येथील कामे वेगाने होणे अपेक्षित होते. परंतु ती झाली नाहीत. करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतूक वाढली. यातून चांदणी चौकातील वाहतूक कोंडीही वाढली. त्यातच चांदणी चौकातील पुलासह सर्व सेवा रस्त्यांवर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने कोंडीत आणखीच भर पडली.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, पोलीस यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले जात होते. ज्यावेळी स्वत: मुख्यमंत्री कोंडीत अडकले, त्यावेळीही केवळ वरच्यावर खड्डयांची डागडुजी केली गेली.
मुख्यमंत्री जाताच दोन दिवसांत पुन्हा खड्डे जैसे थे झाले. परंतु, आता खुद्द केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाचे मंत्री नितीन कडकरी स्वत: पाहणी करण्यासाठी येणार म्हटल्यावर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि रस्त्याची सर्व कामे एका रात्रीत उकरण्यात आली.
चिखलही केला स्वच्छ…
केंद्रीय मंत्री येत असल्याने अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. 1) रात्रीच सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि कामगारांना खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरच्यावरच होणारी मलमपट्टी न करता सिमेंटची भर टाकून खड्डे बुजविले गेले, त्यावर डांबरीकरण करून रस्ता चकाचक करण्यात आला. जेणेकरून याठिकाणी खड्डे नव्हतेच अशी स्थिती दर्शविण्यात आली. तसेच रस्त्याकडेला असलेला चिखल स्वच्छ करून रस्ता सुरक्षित करण्यात आला. हीच तत्परता प्रत्येक वेळी दाखवावी, अशी मागणी आणि चर्चा परिसरात सुरू आहे.