देहूगाव – देहूगाव येथील वैकुंठगमन स्थान परिसरामध्ये एका पिसाळलेल्या कुत्रीने एका महिलेसह चौघा जणांचा चावा घेतला आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह वयोवृद्ध नागरिकाचा समावेश आहे.
पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर मोठी जखम होऊन, रक्तस्त्राव झाल्यास त्यावरील प्रतिबंधक लस देहू प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नव्हते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर येथील रुग्णालयात चौघांना उपचार घ्यावे लागले.
वैकुंठगमन परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने प्रकाश नारायण दांडगे (वय 74), राम पिंक्या ठाकूर (वय 59),कमल व्यंकटराव रणखांबे (वय 45) आणि अंशुमन राजू डोंगरे (वय 16, सर्व रा.देहूगाव) या चार जणांच्या यांच्या पायाला चावा घेतला.
तीर्थक्षेत्र देहू परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही मोकाट कुत्री पिंपरी चिंचवड महापालिकेचे हद्दीतून देहूच्या गायरान जमीन परिसरात सोडले जात असल्याची तर याबाबत देहू नगरपंचायत कडून कोणत्याही प्रकारची सुविधा व कारवाई केली जात नसल्याची ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.वाढत्या मोकाट कुत्र्यांमुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांसह महिलावर्ग, ज्येष्ठ ,वयोवृद्ध नागरिक धास्तावले आहेत. परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.