पिंपरी (प्रतिनिधी) – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरूणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह डिझेल टाकून जाळला. तसेच मृतदेहाचे उर्वरित अवशेष नदीत टाकले. तब्बल चार महिन्यांनी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी चार संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
बिल्लू ऊर्फ विक्की ऊर्फ जसबीर सिंग गुलाजार सिंग विरदी (१९, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. नीरज अशोक जांगयानी (वय २६) ललित लालचंद ठाकूर (वय २१), योगेश केशव पंजवानी (वय ३१ सर्व रा. पिंपरी) हरज्योत सिंग रणजीतसिंग लोहीट (वय २२) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांनी याबाबत रविवारी (दि. २१) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२० रोजी आरोपी आणि मयत बिल्लू यांची भांडणे झाली होती. मयत बिल्लू आणि आरोपी आणि त्याच्या भावाने आरोपी नीरज याला मारहाण केली होती. तसेच आरोपीला काचेची बाटली फोडून मारली होती. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी आरोपी आणि मयत हे एकत्र आले त्यांनी एकमेकांची माफी मागितल्यावर या वादावर तात्पुरता पडदा पडला.
त्यानंतर रात्री ते पुन्हा नशा करण्यासाठी एकत्र बसले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. यावेळी चिडलेल्या आरोपीने बिल्लू याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरीतील डेअरी फार्म जवळ नेऊन डिझेल टाकून जाळून टाकला. मात्र हा मृतदेह पुर्णपणे जळाला नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन त्यांनी डिझेल टाकून तो मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाचे उर्वरित अवशेष दापोडी येथील नदीपात्रात टाकून दिले. बिल्लू बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
रविवारी दुपारी पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे पोलिस ठाण्यात असताना त्यांना एका खबऱ्याने फोन केला. तुमच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा खून करून मृतदेह डेअरी फार्म जवळ जाळून टाकल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीतरी जाळल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.