पिंपरी – रावेतमधील एका उद्यानात दोन वर्षापूर्वी खेळणी तुटली होती. त्याची तक्रार एका ज्येष्ठ नागरिकाने सोमवारी (दि. 2) झालेल्या जनसंवाद सभेत केली. मात्र खेळणी दुरूस्त केल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर त्या ज्येष्ठ नागरिकाने मी दोन वर्ष उद्यानात गेलोच नाही. उद्या जाऊन बघतो, असे उत्तर दिल्याने अधिकाऱ्यांवर कपाळावर हात मारून घेतला.
प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी दर सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते. या सभेमध्ये काही नागरिक केवळ तक्रारच करायची या उद्देशाने येत आहेत.
ब क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी (दि. 2) झालेल्या जनसंवाद सभेत एकूण 10 तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी समन्वयक म्हणून मकरंद निकम आणि कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या. एका नागरिकाने आम्ही घरात राहत नसताही आम्हाला पाण्याचे 750 रुपये बिल आल्याचे सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी मीटर रिंडींगवर फोटो असेल, तो पहा असा सल्ला दिला. मात्र मीटरवर 1500 रिडिंगचा आकडा असून बिलावरील फोटोत 1800 दाखविण्यात आल्याचे सांगितले. त्यावर पाणी पुरवठा विभागास योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना निकम यांनी दिल्या. एका नागरिकाने अनामत रक्कम महापालिकेकडून परत घ्यायची असून 2014 पासून फाइल गहाळ झाल्याचे अधिकारी सांगत आहेत, अशी तक्रार केली.
एका फोटोपासवर अनेक हातगाड्या
शहरातील फेरीवाल्यांनी फोटोपास दाखविल्यावरही महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत असल्याची तक्रार एका फेरीवाल्यांच्या नेत्याने केली. मात्र कारवाईच्यावेळी मूळ पास दाखविल्यावर कारवाई करीत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी त्या नेत्याने झेरॉक्स प्रत दाखिवण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र एका फोटोपासची झेरॉक्स काढून त्यावर अनेक हातगाड्या चालविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा गैरप्रकार टाळण्यासाठी फोटोपासची मूळ प्रत फेरीवाल्यांनी जवळ ठेवावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.