शारजा – मीस्टर 360 अशी सार्थ ओळख असलेल्या एबी डीविलियर्सने केलेली वादळी खेळी तसेच कर्णधार विराट कोहलीच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण वर्चस्व राखले. त्यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे बेंगळुरूने कोलकातासमोर विजयासाठी 195 धावा करण्याचे आव्हान उभे केले.
रॉयल चॅलेंजरचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रतम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऍरन फिंच व देवदत्त पडीक्कल यांनी कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना संघाला 67 धावांची सलामी दिली. पडीक्कल आक्रमकतेने फलंदाजी करत असतानाच बाद झाला. त्याने 23 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 32 धावांची खेळी केली. कोलकाताचा अष्टपैलू आंद्रे रसेलने त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फिंचला साथ दिली. या जोडीने फारसा धोका न पत्करता संघाचा डाव सावरला. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांवर बेंगळुरूने वर्चस्व राखले. फिंच एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत असताना कोहलीने दुय्यम भूमिका घेत एकेरी धावांवर भर दिला व जास्तीत जास्त स्ट्राइक फिंचलाच मिळेल याची दक्षता घेतली.
सुरुवातीच्या सामन्यांनंतर अपयशी ठरत असलेला फिंच या सामन्यात मात्र, आत्मविश्वासाने खेळत होता. त्याने कोलकाताच्या गोलंदाजांवर दडपण आणले. मात्र, तो आपले अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 37 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावून 47 धावांची खेळी केली. यावेळी कोहलीला साथ देताना एबी डीविलियर्सने चांगली कामगिरी केली व 14 व्या षटकात बेंगळुरूने संघाचे शतक फलकावर लावले. यानंतर मात्र, सबकुछ डीविलियर्स असेच चित्र दिसले.
कोहलीला दुय्यम भूमिका घ्यायला लावत त्याने कोलकाताच्या गोलंदाजीची वाताहत केली. त्याने नाबाद 73 धावांची वादळी खेळी करताना केवळ 33 चेंडूंचा सामना केला व त्यात 5 चौकार व 6 षटकार अशी फटकेबाजी केली. त्याला साथ देताना कोहलीने 28 चेंडूत संयमी नाबाद 33 धावा केल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाला 2 बाद 194 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.
कोहलीच्या खेळीच्या जोरावर बेंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्सचा या पूर्वीच्या सामन्यात पराभव केला होता. या विजयानंतर कोहलीचा संघ अचानक वेगळाच भासत आहे. संघातील फलंदाजांचे मनोबल वाढलेले असून ते आता कोणत्याही संघाचा पराभव करतील असेच त्यांच्या खेळातून दिसून येत आहे.
संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 2 बाद 194 धावा. (देवदत्त पडीक्कल 32, ऍरन फिंच 47, एबी डीविलियर्स नाबाद 73, विराट कोहली नाबाद 33, प्रसिध कृष्णा 1-42, आंद्रे रसेल 1-51).