छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात आदर्श को. ऑपरेटिव्ह पतसंस्थेतील अंदाजे दोनशे कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा समोर आला असतानाच, आता शहरातील आणखी एका सहकारी बॅंकेवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले.
त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, बुधवारी सकाळपासून ग्राहकांनी बॅंकेत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक असे या बॅंकेचे नाव आहे.
संभाजीनगर शहरातील जुना मोंढा येथील जाधवमंडी परिसरात ही बॅंक आहे. मंगळवारी आरबीआयने शहरातील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर कारवाई करीत, संपूर्ण व्यवहारावरच निर्बंध घातले आहेत. आरबीआयने मंगळवारी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले.
त्यात आरबीआयच्या मंजुरीशिवाय या बॅंकेला कर्जाचे वितरण, अग्रिम यांस नूतनीकरण आणि कोणतीही गुंतवणूक आणि व्यवहार हे करता येणार नाहीत. त्यामुळे या बॅंकांच्या हजारो ठेवीदार खातेदारांचे लाखो रुपये बॅंकेत अडकले आहेत.
ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपला पैसा परत मिळेल का नाही मिळेल तर कधी, असे प्रश्न ठेवीदारांपुढे निर्माण झाले आहेत.
तर, आम्ही कोणाचेही पैसे बुडवलेले नाहीत आणि बुडणारही नाहीत. तर कोणतीही नोटीस न देताच कारवाई झाल्याने आश्चर्य वाटत असल्याचे अजिंठा अर्बनचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी म्हटले आहे.