मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा नवनियुक्त कर्णधार रवींद्र जडेजा याने शनिवारी (दि.9) झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच एक अनोखा विक्रम साकार केला. जडेजाने चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमधील आपला 150 वा सामना खेळला. ही कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला. याआधी महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाने ही कामगिरी केली आहे.
जडेजाने 150 सामने खेळताना 1 हजार 523 धावांसह 110 बळी मिळवले असून, 69 झेलही घेतले आहेत. सीएसकेकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे. त्याने 217 सामने खेळले आहेत. सुरेश रैनाने 200 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. ड्वेन ब्रावो 123 आणि आर अश्विन 121 सामन्यात चेन्नईचे प्रतिनिधित्व केले आहे.
दरम्यान, आयपीएलच्या पंधारव्या हंगामातील 17 व्या सामन्यात शनिवारी चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायझर्स हैदराबादने आठ गडी राखून चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण करत विजय साकारला होता.