पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामुळे उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलतांना कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले,’माझा विजय निश्चित होईल…’ खरंतर भाजपच्या उमेदवार हेमंत रासने यांनीही यापूर्वीही विजय माझाच होणार असा दावा केला आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतांना रवींद्र धंगेकर यांनी हा दावा केला आहे. रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली त्याच वेळी माझा विजय निश्चित झाला होता असेही त्यांनी म्हंटले आहे. आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार असले तरी रवींद्र धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असून 15 हजार मतांच्या फरकाने मी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.