शिर्डी – साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला श्रीरामनवमी उत्सवाला मोठी धार्मिक परंपरा आहे. या उत्सवाचे हे 112वे वर्ष आहे. मात्र, यंदा अध्यक्ष निवडीवरून शिर्डीत दोन गट पडले असून, एका धार्मिक परंपरेत राजकीय शिरकाव झाल्याचं चित्र निर्माण झाले आहे.
श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी शिर्डी गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन वर्गणी करून तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करतात. हा उत्सव आणि याचे नियोजन करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ एकत्र येऊन सर्वानुमते अध्यक्ष निवडण्याची परंपरा आहे. यंदा अध्यक्ष निवडीवरून शिर्डीत दोन गट पडले आहेत. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसे, शिवसेना (शिंदे गट), कॉंग्रेस या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामनवमी यात्रोत्सव समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे सत्र सुरू आहे.
मात्र, ही महत्त्वाची निवड आता राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. भाजपच्या एका गटात अभय शेळके पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र भा. गोंदकर, सुजित गोंदकर, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातर्फे माजी विश्वस्त सचिन कोते, संजय शिंदे, सुनील परदेशी यांसह अनेक कार्यकर्त्यांनी संजय आप्पा शिंदे यांची अध्यक्षपदी निवड केली. दुसऱ्याच दिवशी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) कमलाकर कोते, राजेंद्र भुजबळ, हिरामण वारुळे, ताराचंद कोते, राजेंद्र कोते, उत्तम कोते, गफ्फार पठाण, दत्तू कोते, अरविंद कोते, सोमनाथ कावळे, नीलेश कोते, नीलेश सरोदे, सचिन तांबे, अनुप गोंदकर, बद्रिनाथ लोखंडे, अनिल शेजवळ, विक्रांत वाकचौरे, दादाभाऊ गोंदकर , भूषण मोरे, सदाभाऊ गोंदकर, सचिन गायकवाड, नितीन धीवर यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे दीपक वारुळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे श्रीरामनवमी उत्सवात दोन गट पडल्याने हा उत्सव कसा साजरा होणार? अशी चर्चा सुरू आहे.
श्रीरामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे व कार्याध्यक्ष जगन्नाथ गोंदकरच राहणार असून, यात्रेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्वखर्चाने करून हा उत्सव ऐतिहासिक करणार आहे.
कैलास बापू कोते, प्रथम नगराध्यक्ष