पुणे – रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेशन दुकानात आता धान्याव्यतिरिक्त बॅंकिंग व्यवहारासोबत रेल्वे, विमान तिकीट आणि एलपीजी सिलिंडरचेही बुकिंग करता येणार आहे. याशिवाय, वीज, पाणी बिल भरण्यासह अन्य सेवाही उपलब्ध होणार आहेत. या सेवा ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. रेशन दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम राज्यातील रेशन दुकानदार करतात. मात्र त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामिण भागात मोठ्या संख्येने रेशन दुकाने आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत गरीब आणि दारिद्र रेषेखालील नागरिकांना गहू, तांदूळ अल्प दरात वितरित करण्यात येतो. परंतु रेशन दुकानदारांना सरकारी योजनेंतर्गत धान्य विक्रीतून मिळणारे कमिशन अत्यल्प आहे. त्यातून रेशन दुकानदारांना कुटुंबाची उपजीविका भागविताना तारेवरची कसरत करावी लागते.
रेशन दुकानादारांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी रेशन दुकानांमधून विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ‘सीएससी इ-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लि.’ या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.