लंडन : विक्रमाच्या पुस्तकांमध्ये नेहमीच चित्रविचित्र घटनांची नोंद होत असते. ब्रिटनमधील एका तीस वर्षे वयाच्या तरूणीच्या नावाने असा अनोखा विक्रम जमा झाला आहे. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी आजी होण्याची नोंद तिच्या नावावर झाली आहे.
केली असे या तरुणीचे नाव असून तिच्या 14 वर्षीय मुलीने एका मुलाला जन्म दिल्याने केली फक्त वयाच्या तिसाव्या वर्षी या मुलाची आजी झाली आहे. या 14 वर्षाच्या मुलीचे नाव स्काय असे असून ती आपल्या आईसोबत राहत नाही तर सावत्र आई आणि पित्यासोबत राहते. 2018 मध्ये स्काय काही कामासाठी डॉक्टरकडे गेले असता ती गर्भवती असल्याचे निदान झाले.
पोटातील गर्भ 36 आठवड्यापेक्षा जास्त वयाचा असल्यामुळे डॉक्टरांनी तिला गर्भपात करण्यापासून परावृत्त केले. सोनोग्राफी प्रक्रियेच्या वेळी तिला आपल्या पोटातील गर्भाचे दर्शन झाल्याने तिच्या मातृत्वभावना जागृत झाल्या आणि हा गर्भ न पाडण्याचे आणि मुलाला जन्म देण्याचे तिने ठरवले. त्याप्रमाणे काही कालावधीनंतर तिने मुलाला जन्म दिला त्या वेळी तिच्या आईचे म्हणजे केलीचे वय तीस होते 2018 मध्ये घटना घडली असली तरी आत्ता या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
केलीने आपल्या मुलीचे अभिनंदन केले असले तरी आणि सर्वात तरुण आजी होण्याचा बहुमान मिळवला असला तरी एवढ्या कमी वयात आई होणे अतिशय त्रासदायक आणि चुकीचे असल्याचे तिने म्हटले आहे. या लहान वयातील मातांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो शिवाय आरोग्यविषयक समस्याही त्यांना सतत सतावत असतात असे केलीने म्हटले आहे.
लहान वयात गर्भवती राहिलेला महिलांसाठी नेहमीच प्रिमॅच्युअर बेबी होण्याचा धोका असतो, त्याना ऍनिमिया आणि ब्लडप्रेशरसारख्या आजाराचा सामना करायची शक्यता जास्त असते. भारतासारख्या मोठ्या देशाचा विचार करता 2017 च्या आकडेवारीप्रमाणे 15 ते 19 या वयोगटातील आठ टक्के मुली गर्भवती राहिल्या होत्या आणि त्यांनी मुलाला जन्म दिला होता. शहरी परिसरपेक्षा ग्रामीण भागामध्ये कमी वयात गर्भवती राहण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.