Ratan Tata । चीनला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी टाटा समूहानेही एक गुप्तचर उपग्रह तयार केला. अवकाशात असलेल्या अनेक देशांच्या उपग्रहांपैकी चीनकडे सर्वाधिक उपग्रह आहेत.
यापैकी अनेकांचा वापर त्याच्या सैन्याद्वारे म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी करतात.अशात आता पहिल्यांदाच खाजगी क्षेत्रातील कंपनी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने भारतीय सैन्याच्या मदतीसाठी लष्करी दर्जाचा अवकाश उपग्रह तयार केलाय. यासाठी टाटा समूहाचे मालक रतन टाटा यांनी इलॉन मस्क यांच्याशी हातमिळवणी केली आहे. एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या रॉकेटमधून एप्रिलमध्ये हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे की, ‘खाजगी कंपनीचा हा पहिला गुप्तचर उपग्रह असेल, जो TASL फ्लोरिडाला पाठवेल आणि तेथून स्पेसएक्स रॉकेटद्वारे एप्रिलमध्ये प्रक्षेपित केले जाईल. गेल्या काही वर्षांत भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर अधिक भर दिला आहे. या दिशेने भारतासाठी हे पाऊल अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.’
क्षेपणास्त्र डागण्याच्या बाबतीत भारत यंदा रशियाला मागे टाकेल अशी चर्चा रशियन वृत्तपत्रांमध्येही आहे. युक्रेनसोबतच्या युद्धानंतर रशिया नवीन क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मागे पडला आहे. क्षेपणास्त्र डागण्याबरोबरच भारत लष्करी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अवकाशाचा वापर करण्यावर भर देत आहे, हेही महत्त्वाचे आहे.
लष्करी हालचाली आणि शत्रूंवर लक्ष ठेवण्याबरोबरच, गुप्तचर उपग्रहांचा वापर उपग्रह-लिंक्ड मानवरहित हवाई वाहनांसाठी (यूएव्ही) देखील केला जाईल, ज्याचा भारतीय लष्कर आपल्या ताफ्यात समावेश करेल. भारतीय लष्कराकडे आधीपासूनच इस्रायली हर्मीस-900 आहे आणि लष्कराच्या ताफ्यात अमेरिकन MQ-9B चा समावेश करण्याची योजना आहे. मात्र, चीनच्या तुलनेत सध्या भारताकडे उपग्रहांची संख्या खूपच कमी आहे. लंडनस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजने प्रकाशित केलेल्या मिलिटरी बॅलन्स रिपोर्टनुसार, 2019 मध्ये चीनकडे 66 गुप्तचर उपग्रह होते, ज्याची संख्या 2022 मध्ये 136 पर्यंत वाढेल.