मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच वेगेवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असते. रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर विजय देवरकोंडा आणि रश्मिका अनेकदा एकत्र दिसतात. मात्र रिलेशनशिपच्या चर्चेनंतर आता त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावरून या दोघांचे ब्रेकअप झाल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.
रश्मिकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मोटिव्हेशनल व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक व्यक्ती तरुणीला “कधी कधी काही गोष्टी यासाठी बिघडतात, जेणेकरून तुमच्या आयुष्यात त्यापेक्षा चांगलं काहीतरी घडणार असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला गमावता कारण त्यापेक्षा उत्तम व्यक्ती तुम्हाला मिळू शकते, हे तुम्हाला समजले पाहिजे. कधी कधी तुम्हाला सर्वांत कठीण मार्गावर चालावं लागतं जेणेकरून तुम्ही आयुष्यातील सर्वांत सुंदर ठिकाणी पोहोचू शकाल, ” असे सांगताना दिसतो.
व्हिडीओत ती व्यक्ती पुढे म्हणते, “मला माहित आहे की हे कठीण आहे पण तुम्ही समजू शकत नाही की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून का निघून गेली? जोपर्यंत तुम्ही हे खरंच पाहू शकत नाही की तुमच्या आयुष्यासाठी हेच सर्वोत्तम होतं. तुमची आताची ही परिस्थिती कायम नसेल. हे वादळ आणि दु:ख निघून जाईल आणि त्यातून तुम्ही उत्तम व्यक्ती म्हणून बाहेर पडाल.” रश्मिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी विजयसोबत तिचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. मात्र त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताने चाहते नाराज झाले आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, रश्मिकाचा लवकरच ‘ॲनिमल’ आणि ‘पुष्पा : द रूल’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.