आणखी 2 लाख किट्स पालिका खरेदी करणार
अर्ध्या तासात रिपोर्ट येत असल्याने लगेच विलगीकरण
पुणे – शहरातील करोना संशयितांच्या चाचण्या तातडीने करून त्यांना विलग ठेवण्यासाठी महापालिका आणखी पावले उचलणार आहे. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात “रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’ करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेकडे सध्या 1 लाख किट उपलब्ध असून लवकरच आणखी 2 लाख किट खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
एका “रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’ किटची किंमत सुमारे 450 रुपये आहे. त्यामुळे आधीच पालिकेने साडेचार कोटी रुपयांच्या किट खरेदी केलेल्या आहेत. तर, आणखी 2 लाख किट घ्यायचे झाल्यास महापालिकेस नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत पुढील आठ दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.
शहरात करोना रुग्णांचा आकडा दिवसाला सरासरी 800 ते 900 पर्यंत गेला आहे. गेल्या आठवड्यात हाच आकडा हजारावर गेला. त्या पार्श्वभूमीवर शहरात करोना नियंत्रणासाठी टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. सध्या दररोज सरासरी साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, यात खासगी तसेच शासकीय लॅबच्या चाचण्यांचे अहवाल येण्यासाठी जवळपास 24 तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे संशयितांकडून शहरात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मागील आठवड्यापासून शहरात “रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’ सुरू केल्या आहेत. या चाचणीचा अहवाल अवघ्या अर्धा तासात येतो. त्यामुळे करोना बाधिताला तातडीने वेगळे करता येते, तर यात निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना घरी सोडले जाते.
सध्या, पालिकेकडून दिवसाला 700 ते 800 “रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’ केल्या जात आहेत. मात्र, आता टप्प्याटप्प्याने या टेस्टचे प्रमाण आणखी वाढवले जाणार आहे. त्यामुळे टेस्ट किटची संख्याही वाढवावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून आणखी दोन टप्प्यांत 2 लाख टेस्ट किट घेण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व मान्यता घेऊन आठवडाभरात आणखी किट मागवण्यात येणार आहेत.