एअरटेल व व्होडाफोनचा प्राधान्यक्रमाचा प्लॅन ट्रायने रोखला
नवी दिल्ली – व्होडाफोन व एअरटेल कंपन्यांनी प्राधान्यक्रमाच्या ग्राहकांना वेगात सेवा देण्याचा प्लॅन जाहीर केला होता. हा प्लॅन थांबवावा, अशा सूचना दूरसंचार नियामक अधिकारिणीने म्हणजे ट्रायने केल्या आहेत. या निर्णयाला व्होडाफोन आयडिया कंपनीने दूरसंचार लवादाकडे म्हणजे टीडीसॅटकडे आव्हान दिले आहे. ट्रायच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
काही प्राधान्यक्रमाच्या ग्राहकांना वेगवान सेवा देणे म्हणजे इतर ग्राहकांच्या सेवांवर परिणाम होणार का, अशी शंका ट्रायने व्यक्त केली आहे. ट्रायने या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनांना पत्र पाठविले आहे. ज्या अर्थी काही ग्राहकांना वेगवान सेवा दिली जात आहे त्या अर्थी काही ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होणार नाही का? इतर ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासंदर्भात काय केले आहे याचे स्पष्टीकरण ट्रायने मागितले आहे.
याबाबत वृत्त माध्यमांनी एअरटेलकडे प्रतिक्रिया विचारली असता एअरटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही भारतासह जगभरातील ग्राहकांना केवळ दर्जेदार सुविधा देण्यासंदर्भात सुपरिचित आहोत. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नावीन्यपूर्ण कल्पनाच्या साहाय्याने ग्राहकांना वेगवान आणि दर्जेदार सेवा देतो. यामध्ये आम्ही कसलाही भेदभाव करीत नाही. त्याचबरोबर आमच्या कंपनीशी एकनिष्ठ असलेल्या पोस्टपेड ग्राहकासाठी आम्ही काही खास अतिरिक्त सेवा नव्या प्लॅननुसार देऊ केल्या आहेत.
आमच्या सेवाच्या दर्जाला जागतिक मानांकन संस्थांनी प्रमाणित केले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. एअरटेलने जे पोस्टपेड ग्राहक महिन्याला किमान 499 रुपये देतील त्यांना प्राधान्यक्रमाने वेगवान सेवा देण्याचे प्लॅन जाहीर केलेला आहे. या ग्राहकांना अधिक चांगल्या फोरजी सेवा देण्यात येतील , असे सांगितले आहे.
नोव्हेंबरपासून प्लॅन अंमलबजावणीचा प्रयत्न
दरम्यान, कॉलदराइतका महत्त्वाचा विषय असताना ट्रायने कंपनीकडे कसलेही स्पष्टीकरण न मागता आमची योजना थांबविण्यास सांगितले आहे याबद्दल आशचर्य वाटले, असे व्होडाफोनमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही हा प्लॅन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाखल केला होता. सुचविलेल्या सुधारणांसह मेमध्ये तो दुरुस्त करण्यात आला. आठ महिन्यांपासून हा प्लॅन सुरू असून बरेच ग्राहक तो स्वीकारू लागले असतानाच ट्रायने हा प्लॅन थांबविण्यास सांगितले आहे.