बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा “83′ चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. या दोघांना एका फ्रेममध्ये बघून असे वाटते की खरोखरचं ते तरुणपणातील कपिल देव आणि रोमी देव आहेत. दक्षिण भारतातील सिनेसमीक्षक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केला.
यामध्ये दीपिका पादुकोण ही रोमी देव आणि रणवीर सिंह हा कपिल देव यांच्या लूकमध्ये दिसत आहेत. दीपिका आणि रणवीरचा हा लूक त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे.
दीपिका पादुकोण ही रोमी देवप्रमाणे लहान केसांमध्ये दिसत आहे. याबाबत दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक क्षण असलेल्या चित्रपटात एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणे नक्कीच गौरवास्पद आहे.
पतीच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आकांक्षांच्या यशासाठी पत्नी किती महत्त्वाची भूमिका निभावत असते, हे मी माझ्या आईच्या रूपात खूप जवळून पाहिले आहे. माझ्यासाठी अनेक प्रकारे “83′ त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे, जी आपल्या पतीच्या स्वप्नांना आपल्या स्वप्नांच्या पुढे ठेवते, असे नमूद करत दीपिकाने रोमी देवच्या भूमिकेतील फर्स्ट लूक शेअर केला.