Bellasis Bridge| मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन १३० वर्षे जुना बेलासिस पूल पडला जाणार आहे. निवडणुकीनंतर हे पाडकाम होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच बेलासिस पूल पाडून पुनर्बांधणी केली जाणार आहे.
पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेतर्फे या पुलाचे काम केले जाणार असून मुंबई महापालिका तब्बल ७२ कोटी २१ लाख ९३ हजार रुपये खर्च करणार आहे. तर पश्चिम रेल्वे या पुलासाठी २४ कोटी रुपये खर्च करणार आहे.
पूल नव्याने बांधण्याचा का घेतला निर्णय?
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल कोसळून दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. तर २०१९ मध्ये सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले होते. या पुलांच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.आयआयटी मुंबईने पुलांचे ऑडिट केले असता मुंबई सेंट्रल व ग्रँट रोड दरम्यान असलेला बेलासिस पूल धोकादायक झाल्याने पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा नवीन बांधण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर हा पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पुलाची उभारणी सन १८९३ मध्ये
या पुलाची उभारणी सन १८९३ मध्ये करण्यात आली आहे. पुलाची लांबी ३८० मीटर आणि रुंदी २२.२० मीटर आहे. तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या रुळांपासून पाच मीटर असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पूलाची उंची साडेसहा मीटर असणार आहे.
बेस्टच्या मुंबई सेंट्रल आगाराच्या अखत्यारीतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक पूल दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार ११ मे रोजी मध्यरात्रीपासून बससह अवजड वाहनांना दोन्ही दिशेने प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काही बसमार्गांत बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
PM मोदी बराकपूरमध्ये म्हणाले,’पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात आले..’