Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final, 2nd day : मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांवर आटोपला. कारकिर्दीतील शेवटच्या प्रथम श्रेणी सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी प्रभावी कामगिरी करत आहे. त्याने विदर्भाला 105 धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धवल कुलकर्णीने 11 षटकात 5 मेडन्ससह केवळ 15 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. कुलकर्णी याने विदर्भाची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करण्याचे काम केले.
विदर्भाने आज दुसऱ्या दिवशी 3 बाद 31 वरून आपला पहिला डाव पुढे सुरु केल्यावर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. आज पहिला धक्का बसला तो अथर्व तायडेच्या रूपाने. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला 23 धावा करता आल्या. यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पाहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला 19, अक्षयला पाच आणि हर्षला एक धाव करता आली. यानंतर तनुषने तीन गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विदर्भाकडून यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या.
दरम्यान, पहिल्या दिवशी शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला देखील खातेही उघडता आले नाही.
मुलाणी-कोटियन यांनाही 3-3 बळी..
धवल कुलकर्णीने विदर्भाचा सलामीवीर अथर्व तायडे (23), अमन मोखाडे (8) आणि करुण नायर यांचे बळी घेतले. करुण नायर 12 चेंडू खेळून खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. कुलकर्णी व्यतिरिक्त शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही विदर्भाच्या पहिल्या डावात प्रत्येकी 3 बळी घेतले. शार्दुल ठाकूरच्या खात्यात केवळ 1 यश आले.
Innings Break!
Mumbai have bowled Vidarbha out for 105 in the 1st innings, taking a lead of 119 runs.
3⃣ wickets each for Dhawal Kulkarni, Shams Mulani & Tanush Kotian
1⃣ wicket for Shardul Thakur@IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVIDScorecard ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/OeswFfXSoV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 11, 2024
मुंबई संघाला 119 धावांची आघाडी…
या सामन्यात, विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यामुळे मुंबई संघाला 119 धावांची आघाडी मिळाली आहे. शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 75 धावांची इनिंग खेळली होती. शार्दुलशिवाय पृथ्वी शॉने 46 आणि भूपेन लालवानीने 37 धावा केल्या. विदर्भाकडून पहिल्या डावात गोलंदाजीत हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर उमेश यादवने दोन गडी बाद केले. आदित्य ठाकरेने एक विकेट घेतली.