Share Market: देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली वाढ आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी (11 मार्च) थांबली. रिलायन्स, टाटा मोटर्स आणि बँकिंग समभागांच्या विक्रीमुळे शेअर बाजार 600 हून अधिक अंकांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत मंगळवारी महागाई आणि आयआयपीची आकडेवारी जाहीर होणार आहे. या कारणास्तवही आज गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 617 अंकांनी घसरला. त्याचवेळी निफ्टीनेही 161 अंकांची घसरण नोंदवली.
बीएसईचा 30 शेअर्सचा मानक निर्देशांक सेन्सेक्स 616.75 अंकांच्या किंवा 0.83 टक्क्यांच्या घसरणीसह 73,502.64 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये आज 73,433.91 आणि 74,187.35 च्या रेंजमध्ये व्यवहार झाला.
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या निफ्टीनेही 160.90 अंकांची म्हणजेच 0.72 टक्क्यांची घसरण नोंदवली. निफ्टी 22,332.65 अंकांवर बंद झाला. आज निफ्टीने 22,307.25 आणि 22,526.60 च्या रेंजमध्ये व्यवहार केले.
लार्ज कॅप समभाग घसरले –
टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एसबीआय, एचयूएल, टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी 1 ते 3 टक्क्यांच्या दरम्यान घसरल्याने बहुतेक लार्जकॅप समभाग लाल रंगात बंद झाले.
SBI चे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले –
एप्रिल 2019 पासून राजकीय पक्षांनी कॅश केलेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्याची स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसल्यानंतर बँकेचे शेअर्स लालफितीत आले. आजच्या व्यवहारात SBI चे शेअर्स 788.65 रुपयांवर उघडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बँकेचे शेअर्स इंट्राडेमध्ये जवळपास 2 टक्क्यांनी घसरले. मार्केट बंद झाले त्यावेळी एसबीआयच्या शेअरची किंमत 773 रुपयांवर बंद झाली.
गुंतवणूकदारांचे 3.21 लाख कोटी रुपयांचे नुकसान –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 11 मार्च रोजी 389.60 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवार, 7 मार्च रोजी 392.81 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 8 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.05% वाढ झाली आहे. यानंतर, बजाज फिनसर्व्ह 0.83 टक्के, बजाज फायनान्स 0.29 टक्के, टाटा कन्सल्टन्सी 0.28 टक्के, एशियन पेंट्स 0.25 टक्यांनी वाढले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर उर्वरित 22 सेन्सेक्स समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडचे शेअर्स 2.53 टक्क्यांनी घसरले. तर टाटा स्टील 2.38 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) 1.86 टक्के, इंडसइंड बँक 1.53 टक्के आणि हिंदुस्थान युनिलिव्हर 1.34 टक्यांनी घसरले.
2,116 समभागांमध्ये वाढ झाली
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज, शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,081 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 923 शेअर्स वाढीसह बंद झाले. 3,036 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 122 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 193 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 105 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.
शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार कसा होता?
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (7 मार्च) सलग दुस-या दिवशी विक्रम नोंदवत सर्वकालीन उच्चांक गाठला होता. इंट्राडे ट्रेड दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्सने 74 हजार अंकांची पातळी ओलांडली आणि 74,245.17 ही सर्वोच्च पातळी गाठली होती.
त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी-50 ने देखील विक्रम मोडला आणि इंट्राडे ट्रेडमध्ये 22,525.65 ही सर्वकालीन उच्च पातळी गाठली होती.
तथापि, नंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीच्या वाढीमध्ये थोडीशी घसरण झाली परंतु गुरुवारी देखील त्यांचे शेअर्स सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाले. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 74,242.74 अंकांवर उघडला आणि व्यवहारादरम्यान 73,921.48 अंकांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. शेवटी, सेन्सेक्स 0.05 टक्के किंवा 33.40 अंकांच्या वाढीसह 74,119.39 वर बंद झाला होता.