लाखणगाव – जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील ग्रामदैवत वडजादेवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला होता. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लावली गेलेली मुलींची कुस्ती उपस्थितांची मने जिंकू गेली. या कुस्त्यांनी जारकरवाडीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडली.
दोन दिवस पार पडलेल्या वडजादेवी यात्रेमधे गुरुवारी (दि. 5) दुपारी पाच वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. या आखाड्यात सातारा, नगर, सांगली, पुणे, देहू, आळंदी, भोसरी, शिक्रापूर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यातील नामांकित पैलवानांनी कुस्तीशौकिनांची मने जिकंली.
100 रुपयांपासून 7 हजार 777 रुपये, बारा चांदीच्या ढाली व एक चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. या आखाड्यात मुलींच्या कुस्त्याही लक्ष वेधी ठरल्या. रात्री मनोरंजनासाठी गौरव माझ्या महाराष्ट्राचा व विठ्ठलकृपा कलानाट्य मंडळ जारकरवाडी हा करमणुकीचा कार्यक्रम पार पडला, तसेच दोन दिवस भजने, कलगी तुऱ्याचा सामनाही झाला. यात्रेचे संपूर्ण नियोजन समस्त जारकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.