विद्यार्थ्यांचे आपल्या आईबाबांस भावनिक पत्र- कर्जत जामखेड: दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. पाण्यासाठी आमदार रोहित पवार यांची असलेली तळमळ, तसेच त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. याच अनुषंगाने ‘दुष्काळमुक्त गावा’च्या मथळ्याखाली आमदार रोहित पवार यांचीच विनंती असलेलं एक भावनिक पत्र शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना दिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावरही हजारो मनांवर मनसंधारणाचेही काम करत आहे.या पत्रातील मनाला भेडसावणाऱ्या ओळी… ‘आज आपल्याच घरात पत्र लिहिण्याचे कारण की, आपले गाव वॉटर कपस्पर्धेमध्ये सहभागी झाले आहे आणि गावाला दुष्काळातुन बाहेर काढण्याकरता एक संधी आली आहे म्हणुन आपण या वॉटर कप स्पर्धेमध्ये आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी पुढे येऊया. आई बाबा मला दुसरे काहीही नको फक्त पाणीदार गाव हवं आहे.ज्या गावामध्ये पाणीच पाणी असेल,सर्व शेतकरी सुखी असतील.आमच्या डोक्यावर आई वडिलांची छाया असेल.बाबा भीती वाटते हो या दुष्काळाची,मागल्या वर्षी बघितलेल्या संकटांची,गुरेढोर छावणीवर बांधले त्या ठिकाणी पुन्हा जाऊन रहायची. आता पुन्हा तेच दिवस येतील की काय? याची भीती वाटायला लागली आहे.तुमच्याकडे मला खाऊ नको,पैसे नको,नवीन कपडे नको,मोठं घर नको,मोटर गाडी नको,फक्त आपलं गाव पाणीदार पाहिजे. बाबा घ्याल ना हो गाव पाणीदार करून? तुमच्याकडे खुप मोठी आशा घेऊन हे पत्र लिहीत आहे. गावाला दुष्काळातुन पाणीदार करायला लावणारे हे पत्र जलसंधारण आणि मनसंधारणाचे नक्कीच काम करेल यात शंका नाही.