मुंबई – “दंगल’ आणि “छिछोरे’चा डायरेक्टर नितेश तिवारीचा बहुचर्चित “रामायण’मधील रामाच्या भूमिकेसाठी दक्षिणात्य ऍक्टर महेशबाबू आणि रावणाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनच्या नावाची चर्चा सुरू होती.
मात्र, आता महेशबाबूने रामाच्या रोलला नकार दिला असल्याचे समजते आहे. त्याला एस. एस. राजामौली यांच्या सिनेमावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानंतर रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरला विचारण्यात आले होते. रणबीरनेही या सिनेमामध्ये काम करण्यास उत्सुकता दाखवली.
मात्र, पूर्ण स्क्रिप्ट ऐकल्याशिवाय होकार द्यायचा नाही असे त्याने ठरवले आहे. तीन भागांमध्ये होणाऱ्या या सिनेमासाठी एकूण 700 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. पुढच्या वर्षाच्या मध्यात या सिनेमाला सुरुवात होणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये “रामायण’ची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
रणबीर आता “शमशेरा’मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा यावर्षी जूनमध्ये रिलीज होणार होता. मात्र, कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे यशराज फिल्मचा हा रिलीज पुढे ढकलला गेला. “शमशेरा’मध्ये रणबीरबरोबर संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील असणार आहेत. त्यानंतर रणबीर आलिया बरोबर “ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे.