तरिही राणा जगजीत सिंह पाटील भाजपमध्ये जाणार
उस्मानाबाद- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी एक नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय राणा जगजीत सिंह पाटील यांनी आज आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले. राणाजगजीत सिंह पाटील हे राज्यातील माजी मंत्री असून शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनींचा विवाह पवार यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झाला आहे.
राणा जगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उस्मानाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यसाठीच आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या सोलापूरात भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राणा जगजीतसिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. त्यांचे वडीलही भाजपमध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. राणा जगजीत सिंह यांनी आपल्या समर्थकांच्या बैठकीमध्येच आपल्या भाजप प्रवेशाबाबतची माहिती दिली.
शरद पवार हे आपल्यासाठी देवासारखे आहेत, असेही ते म्हणाले. आपले नातेवाईक पद्मसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल काल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शरद पवार रागावले होते. “कोण नातेवाईक ? कोणत्याही नातेवाईकांचा मुद्दा इथे उपस्थित नाही. तुम्ही जे म्हणता आहात, ते चुकीचे आहे.’ असे पवार म्हणाले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्र सिंह भोसले, संदीप नईक आणि वैभव पिचड यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बारोरा आणि मुंबई शहराध्यक्ष सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.