मुंबई – महिला संघाचे तत्कालीन प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या वर्तनाबाबत तक्रार केल्यानंतर मला या एकूणच प्रकरणाचा खूप मानसिक त्रास झाला, असा खुलासा भारताची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हीने केला आहे. मितालीने नुकतीच निवृत्ती जाहिर केली होती व लगेचच तीने या गाजलेल्या घटनेवर भाष्य केले आहे.
मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1999 साली पदार्पण केले. तीने तब्बल 23 वर्षे देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिच्या कारकीर्दीत अनेक वाद तिच्याशी जोडले गेले होते. त्यातील रमेश पोवार यांच्याबातचा वाद सर्वात जास्त गाजला होता.
पोवार यांच्याविरोधात मितालीने तक्रार करताना त्यांची वर्तणूक योग्य नसल्याचा आरोप केला होता. तर पोवार यांनीही पलटवार करत मितालीला समजून घेणे कठीण असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर पोवार यांना पदावरुन हटवण्यात आले होते.