क्वीन्सटाउन – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने अर्धशतक ठोकत इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्डसच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. परंतु अन्य भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने यजमान न्यूझलींडने शनिवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात 62 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना सुझी बेट्सने केलेल्या शतकीय खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 275 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारताचा डाव 49.4 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला.
221वा एकदिवसीय सामना खेळलेल्या 39 वर्षीय मितालीने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि शेवटच्या 11 डावात सातवे अर्धशतक झळकावले. मितालीने 73 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड या चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक हजार धावा पूर्ण करून मितालीने इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डसच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. न्यूझीलंडविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यात 1000 धावा पूर्ण करणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.
या सामन्यात यास्तिका भाटियाने तिला सुरेख साथ दिली. तिने 63 चेंडूत 41 धावा करत मितालीसह 88 धावांची भागीदारी केली. मात्र, अन्य फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने भारताला 49.4 षटकांत 213 धावांपर्यत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून जेस केरने 4 बळी घेतले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून सलामीवीर सुझी बेट्सने 11वे एकदिवसीय शतक झळकावले. राजेश्वरी गायकवाडने पूजा वस्त्राकरच्या चेंडूवर तिचा झेल सोडल्याने सुझीला 14 धावांवर जीवदान मिळाले. याचा पुरेपूर फायदा घेत सुजीने 111 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. पण भारताने शेवटच्या पाच विकेट्स 25 धावांत घेत यजमानांना 48.1 षटकात 275 धावांवर रोखले. भारताकडून झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : 48.1 षटकात सर्वबाद 275 (सुझी बेट्स 106, मॅडी ग्रीन 17, अमेलिया केर 33, ए. सॅटर्थवेट 63, सोफी डिव्हाईन 13. झुलन गोस्वामी 2-58, पूजा वस्त्राकर 2-55, राजेश्वरी गायकवाड 2-28, दीप्ती शर्मा 2-47) Vs भारत : 49.1 षटकात सर्वबाद 213 (शफाली वर्मा 12, यास्तिका भाटिया 41, मिताली राज 59, हरमनप्रीत कौर 10, रिचा घोष 22, पूजा वस्त्राकर 23, झुलन गोस्वामी नाबाद 13. जेस केर 4-35, हेली जेन्सन 2-36)