नवी दिल्ली- देशातील प्रसिद्ध कंपनी “ओयो रूम्स’चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले. अधिक माहितीनुसार, गुरुग्राममधील एका इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला.
दुपारी एकच्या सुमारास पोलिसांना “डीएलएफ’ सुरक्षा पथकाकडून गुरुग्राममधील सेक्टर 54, द क्रेस्ट सोसायटीच्या 20 व्या मजल्यावरून एक व्यक्ती पडली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ती व्यक्ती “ओयो’ संस्थापक रितेश यांचे पिता असल्याचे निश्पन्न झाले. सुरक्षारक्षकांनी रमेश यांना पारस रुग्णालयात नेले परंतू, तिथे पोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी मुलगा आशिष अग्रवालांच्या जबाबानंतर सीआरपीसी कलम 174 अन्वये तपास अहवाल नोंदविण्यात आला आहे. “ओयो’ संस्थापक रितेशचे या आठवड्यात लग्न झाले होते. 7 मार्च रोजी दिल्लीतील पंचतारांकित ताज पॅलेस हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल लग्नाचे रिसेप्शन देखील झाले होते.
उद्योजक रितेश अग्रवाल हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. केवळ 19 वर्षांचा असताना रितेश यांनी “ओयो’ची स्थापना केली होती. “ओयो’ आता 80 देशांमधील 800 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे.