मुंबई : शिवसेनेचे नेते आणि सध्याचे एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले रामदास कदम यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल सुरु केला आहे. त्यातच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत. त्यांना मराठा व्यक्ती मोठा झालेला आवडत नाही. हे आपण जबाबदारीने बोलत आहोत, असे खळबळजनक विधान केले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.यावेळी बोलताना रामदास कदम यांनी, “मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही. उद्धव ठाकरे अडीच वर्षात तीन वेळा मंत्रालयात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली,” अशी कोपरखळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना मारली आहे.
“आदित्य ठाकरे याचं वय आता ३१ वर्षे आहे, तेव्हाच आपलं राजकीय वय ५२ वर्षे आहे. आपलं वय काय, काय बोलतो, आपण ठाकरे कुटुंबातील आहोत, याचं भान आदित्य ठाकरेंनी ठेवायला हवे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.
तसेच शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून बंडखोर आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यालाही रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मातोश्रीवर गेलेल्या १०० खोक्यांचा हिशोब यांना द्यावाच लागेल. मातोश्रीवर कितीही मिठाईचे खोके गेले तरी त्यांना कधीही डायबिटीज होत नाही,” असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.