श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पोलिसांना हाताशी धरून उद्योजक अंबानींच्या घराखाली जिलेटिन ठेवणार असतील तर महाराष्ट्रात उद्योजक कसे येतील, असा प्रश्न उपस्थित करून उद्योजक आमच्यामुळे नव्हेतर यांच्यामुळे पळाल्याचा घणाघाती आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री सामंत यांनी येथील एमआयडीसीतील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, सिद्धार्थ मुरकुटे, शुभम वाघ आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले, येथील एमआयडीसीला १९८३ साली (स्व.)बॅरिस्टर रामराव आदिक व गोविंदराव आदिक यांनी मंजुरी दिली. येथील एमआयडीसीचा विस्तार केल्यास चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू शकतो. त्यासाठी लागणारी सवलत माझ्यावर सोडून द्या. गेल्या पावणेदोन वर्षात कोणालाही अँटी चेंबरमध्ये न बोलविता साडेदहा हजार कोटी रुपये थेट उद्योजकांच्या खात्यात पाठविले. अशोक चव्हाणांनंतर आपल्या आधी एकही उद्योगमंत्री श्रीरामपूरला भेट द्यायला आला नाही, हे दुर्दैव आहे. दावोसमध्ये तीन लाख ७८ हजार कोटी रुपयांचे करार पहिल्यांदाच महाराष्ट्राने केले. त्यातील ६५ टक्के अंमलबजावणीही झाली आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प इकडे तिकडे गेला म्हणण्यापेक्षा आपल्याकडे उद्योग मंत्रीपद असताना आपण साडेसात वर्षे काय केले हेदेखील महाराष्ट्राच्या जनतेला आज ना उद्या सांगावे लागेल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तुमच्या मागील अडीच वर्षात फक्त पाच हजार उद्योजकांची निर्मिती झाली होती. मात्र, मंत्रीपद आपल्याकडे आल्यानंतर आम्ही ३३ हजार उद्योजक महाराष्ट्रात बनविण्यात यशस्वी झालो. या माध्यमातून किमान ६६ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.