‘निवडणूक भाजपने जिंकल्यास उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी तुरूंगात जातील..’ – अरविंद केजरीवाल

Lok Sabha Election 2024 । तुरूंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. देशात हुकूमशाही लादण्यासाठी मोदींनी एक देश, एक नेता या मिशनवर काम सुरू केले आहे. त्यांना सर्व नेते संपवायचे आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने केजरीवाल शुक्रवारी ५० दिवसांनंतर तुरूंगाबाहेर आले. त्यानंतर शनिवारी दिल्लीतील आपच्या मुख्यालयात आयोजित मेळाव्यात त्यांनी घणाघाती भाषण केले. मोदींनी दोन पातळ्यांवर खतरनाक मिशन हाती घेतले आहे. त्यामागे विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरूंगात धाडणे आणि भाजपच्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवणे असा उद्देश आहे.
यावेळची निवडणूक भाजपने जिंकल्यास विरोधी गोटातील उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, एम.के.स्टॅलिन, पिनरयी विजयन आदी नेते तुरूंगात जातील. भाजपचे नेतेही मोदींच्या तावडीतून सुटणार नाहीत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना याआधीच निवृत्त करण्यात आले.
शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे आदींचे राजकारण संपवण्यात आले. पुढचा नंबर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे. भाजप जिंकल्यास उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री बदल होईल, असा दावा त्यांनी केला.





