नगर – शहराच्या काही भागांत करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या परिसरातील करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील रामचंद्र खुंट, पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चौक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्र.4, आंबेडकर चौक, जुने तालुका पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट व रामचंद्र खुंट परिसर हॉटस्पॉट’ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी 14 मे रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. शहरातील झेंडीगेट परिसरात दोन दिवसांत करोनाचे पाच रुग्ण आढळल्याने, हा परिसर मध्यरात्रीपासून हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला. या परिसरातील नागरिकांना गुरुवारी (दि.14) सकाळपासून महापालिका प्रशासन जीवनावश्यक वस्तू पुरविणार आहे. सुभेदार गल्लीत मंगळवारी (दि.12) एक महिला करोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते.
त्यातील काही अहवाल बुधवारी (दि.13) प्राप्त झाले. यात आणखी चार जण करोनाबाधित असल्याचे आढळले होते. शहर करोनामुक्त झाल्याचे समजून सर्व नागरिक खरेदीसाठी विविध दुकानांत जाऊ लागले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ सोडून उर्वरित सर्व दुकाने खुली होऊ लागली होती. अशातच शहरात सहा रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. झेंडीगेट परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, मुख्य टपाल कार्यालय आदी शासकीय कार्यालये आहेत.
या कार्यालयांत जाण्यासाठी केवळ एक रस्ता खुला ठेवून उर्वरित भाग हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. परिसरातील कोणतेही दुकान उघडता येणार नाही. येथे मुस्लिमांची संख्या अधिक आहे. रमजान महिना सुरू असला, तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. कोणतीही वस्तू महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच खरेदी करावी लागणार आहे.