Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे, परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.
हा भव्यदिव्य सोहळा अनुभवण्यासाठी उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अश्या अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात राममय वातावरण झालं आहे. देशभरात अनेक जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणि तयारी केली जात आहे.
मात्र, अश्यातच गर्भवती महिलांनी एक वेगळाच हट्ट धरल्याचं चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. 22 जानेवारीलाच आपली डिलीव्हरी व्हावी असा अनेक गर्भवती महिलांचा आग्रह आहे. अनेक खासगी तसेच सरकारी हॉस्पिटल्समध्ये दररोज किमान पाच ते 10 गर्भवती महिला या 22 जानेवारीला सिझेरियन (सीझर ऑपरेशन) डिलीव्हरीसाठी डॉक्टरांशी सल्लामसलत करताना दिसत आहेत.
बिहार ओब्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील 100 हून अधिक लोकांनी वेगवेगळ्या महिला डॉक्टरांशी संपर्क साधला आहे आणि प्रसूतीची तारीख 22 जानेवारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विनंती केलेल्या सर्व गर्भवती महिला 22 जानेवारीलाच सिझेरिअन पद्धतीने प्रसूती करण्यासाठी तयार आहेत. या दिवशी प्रसूतीबाबत ज्योतिषांकडूनही सल्ला देखील घेण्यात येत आहे.
22 जानेवारी हा दिवस अतिशय शुभ असल्याचे गर्भवती महिला तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानत आहेत. या दिवशी श्रीराम येत आहेत, म्हणून या शुभ दिवशी आपल्या कुटुंबातील नवीन सदस्य या जगात यावा अशी भावना व्यक्त केली जात आहे. आणि त्यामुळेच ज्योतिषांकडून सल्ला घेणे किंवा डॉक्टरांशी संपर्क साधून सल्लामसलत करणे असे प्रकार सध्या दिसून येत आहे.
असे करणे आई आणि बाळ दोघांसाठीही घातक –
अनेक महिला डॉक्टरांनी याला विरोध केला असून असे करणे आई आणि बाळ दोघांसाठीही घातक असल्याचे म्हटले आहे. गरोदर महिलांनी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता वेळेवर बाळाला जन्म द्यावा, असे केल्याने दोघांचेही आरोग्य चांगले राहील, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.