France: राजकीय पेचप्रसंगाचा सामना करत असलेल्या फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षीय गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी निवड केली आहे. यानंतर गॅब्रिएल अटल हे फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर गॅब्रिएल अटल यांनी त्यांची जागा घेतली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या युरोपियन युनियन निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन आपल्या संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत असताना गॅब्रिएलची पंतप्रधान म्हणून ही नियुक्ती झाली आहे.
एलिझाबेथ बॉर्नची घेतली जागा –
गॅब्रिएल अटल यांनी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची जागा घेतली आहे. एलिझाबेथ बॉर्न यांच्या राजीनाम्याचे कारण नवीन इमिग्रेशन कायद्याबाबत वाढता राजकीय तणाव असल्याचे मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कायद्याचे समर्थन केले होते. राष्ट्रपतींनी सोमवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून मंगळवारी नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांची मे 2022 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे त्या या पदावर होत्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.
फ्रान्सचे नवे पंतप्रधान समलिंगी –
फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान अटल यांचा जन्म मार्च 1989 मध्ये झाला होता. त्यांचे वडील ज्यू वंशाचे आहेत तर त्यांच्या आईचे पूर्वज ग्रीक-रशियन होते. अटल उघडपणे समलिंगी आहेत.
गॅब्रिएल अटल हे सर्वात तरुण मंत्री –
फ्रान्सचे नवे आणि सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रिएल अटल हे आतापर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या जवळच्या लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण शिक्षण मंत्री देखील होते. अटल हे समाजवादी गटातील आहेत. सरकारी प्रवक्ते म्हणून अटल यांनी आपले राजकीय वर्चस्व वाढवले आहे. अटल हे समंजस, सुज्ञ राजकीय म्हणून ओळखले जातात.