भोसरी – जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत भोसरीतील राजमाता जिजाऊ क्रीडा प्रतिष्ठानच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद मिळविले. या संघातील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर किशोर व किशोरी गटातील पुणे जिल्हा खो खो निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील एकूण 30 संघांनी सहभाग घेतला होता. पिंपरी-चिंचवड राजमाता जिजाऊ क्रीडा प्रतिष्ठान मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला. अंतिम सामना हा माऊली स्पोर्टस क्लब इंदापूर विरुद्ध राजमाता जिजाऊ क्रीडा प्रतिष्ठान भोसरी या दोन्ही तुल्यबळ संघामध्ये झाला.
अंतिम सामना हा 17-17 अशा समान गुणांवर थांबला. त्यामुळे पुन्हा तिसरा डाव घ्यावा लागला. यात राजमाता जिजाऊ संघ 11 गुण तर माऊली स्पार्टसने 6 गुण अशा 5 गुणांच्या फरकाने अंतिम सामना जिंकून राजमाता जिजाऊ संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ 28 गुण व माऊली स्पोर्टस 23 गुण मिळविले. या सामन्यात विजयाचा मोठा वाटा राजमाता जिजाऊ संघाकडून दीपाली राठोड, भाग्यश्री बडे, प्रेरणा कांबळे, मानसी पवार, मेघना साळुंके, संस्कृती औटी, अपेक्षा मोरे यांनी उचलला. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे, प्रतापराव खिरीड, नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अभिनंदन केले.