मजूर पुरविण्यासाठी सव्वा कोटींचा वाढीव खर्च

पिंपरी – “इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील महापालिकेच्या पाण्याच्या टाकींवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविण्याच्या कामात वाढीव किमान वेतनामुळे तरतूद रक्‍कम पूर्ण खर्च झाली आहे. त्यामुळे या कामासाठी 3 कोटी 60 लाख रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच या कामाला मुदतवाढ देण्यात येणार असून 1 कोटी 20 लाख रूपये वाढीव खर्च करण्यात येणार आहे.

पाण्याच्या टाक्‍यांवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविण्यात येतात. “इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीअंतर्गत भोसरी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल, बोऱ्हाडेवाडी, शांतीनगर, संत तुकारामनगर पाण्याची टाकी, गवळीमाथा परिसर या भागांचा समावेश होतो. येथील टाक्‍यांवरून पाणीपुरवठा करण्यासाठी शुभम उद्योग या ठेकेदारामार्फत सध्या मजूर पुरविले जातात. विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉल्व्ह ऑपरेशन करून पाणीपुरवठा करण्यात येतो. या कामासाठी ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या किमान वेतनातील वाढीव फरकापोटी मूळ कामाच्या निविदेत सुधारित प्रशासकीय रक्कम 2 कोटी 60 लाख रूपये इतकी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. सुधारित वाढीव खर्च 2 कोटी 50 लाख रूपये खर्चास मान्यता
घेतली आहे.

अर्थसंकल्पातील मजूर पुरविण्याच्या कामासाठी सन 2019-20 साठी 70 लाख रूपये तरतूद करण्यात आली आहे. वाढीव किमान वेतनामुळे तरतूद मे अखेरपर्यंत पूर्ण खर्च झाली आहे. या कामाची मूळ मुदत 30 जुलै 2019 पर्यंत आहे. नवीन कामाची निविदा 1 कोटी 2 लाख रूपये एवढी आहे. नवीन कामाची निविदा कार्यवाही चालू असल्याने नवीन कामाचा आदेश प्राप्त न झाल्याने शुभम उद्योग यांना या कामासाठी पुन्हा सुधारित प्रशासकीय रक्कम आणि वाढीव खर्चासह मुदतवाढ दिली जाणार आहे. या कामासाठी वाढीव तरतूद सन 2019-20 करिता 1 कोटी 20 लाख रूपये इतकी आवश्‍यक आहे. जुनी तरतूद संपल्याने 2019-20 च्या कामामधून 90 लाख रूपये तरतुदीतून खर्च करण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×