कोलकाता : कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. शारदा चीटफंड घोटाळ्याप्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी आज सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या, शनिवारी सुनावणी होणार असल्याची माहिती कुमार यांचे वकील गोपाळ हलदार यांनी दिली.
राजीवकुमार हे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक असून या घोटाळ्यातील महत्त्वाचे पुरावे लपवून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आतापर्यंत ते सीबीआयच्या चौकशीला गैरहजर राहिले असून त्यांचा ठावठिकाणाही लागलेला नाही. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांचा एका पंचतारांकित हॉटेलमध्येही शोध घेतला. दरम्यान, शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्याविरुद्ध अटक वॉरण्ट जारी करण्याची मागणी गुरुवारी सीबीआयने न्यायालयाकडे केली.
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राजीवकुमार यांच्यावर अनेकदा नोटिसा बजाविण्यात आल्या असतानाही ते सीबीआयसमोर हजरच झाले नाहीत. राजीवकुमार चौकशीला सहकार्यच करीत नाहीत, असे सीबीआयच्या वकिलांनी अलिपोरचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सुब्रत मुखर्जी यांना सांगितले.