राजगुरूनगर – अज्ञात कारणावरुन खरपुडी ता खेड हद्दीत २८वर्षीय युवकाचा निघृण खून करण्यात आला असून त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रावरही हल्ला केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. रामदास सोपान थिटे वय २८ , रा. सडकवस्ती रेटवडी, ता खेड असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे. तर दत्तात्रय रामदास टाकळकर हे गंभीर जखमी झाला आहे.ही घटना बुधवारी रात्री (दि १५) घडली.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अतुल थिटे यांनी या घटनेची खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीला नातलगाकडून माहिती मिळाली की, कनेरसर ते खेड मार्गावरील खरपुडी बुद्रुक येथे हॉटेल माथेरान गारवा जवळ रस्त्यावर माझा चुलत भाऊ रामदास सोपान थिटे व दत्तात्रय रामदास टाकळकर हे गंभीर जखमी अवस्थेत पडले असल्याचे सांगितले.
फिर्यादी इतर नातलगासह घटनास्थळी गेले असता, दोघेही जखमी व बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या जवळ दुचाकी मोटारसायकल व काचेची फुटलेली बाटली दिसून आली. दोन्ही जखमीना खेड पोलिसाच्या मदतीने चांडोली येथील ग्रामिण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी रामदास थिटे यांचा मुत्यू झाला असल्याचे सांगितले. दत्तात्रय टाकळकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला फारसे बोलता येत नव्हते.
या प्रकरणी खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबधित हॉटेलमध्ये अज्ञात कारणावरून मित्रांमध्ये भांडण होऊन जीवे मारण्याच्या उदेशाने रामदास थिटे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागीच मुत्यु झाला. असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव करित आहे.