मुंबई – महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज (दि. १६) बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. न्यालयाच्या या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे.
दरम्यान, याच प्रशवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. कोल्हे यांनी या संदर्भातील एक भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अतिशय आनंदाची बातमी शेअर करतोय.., आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…. होय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यावर आज न्यायालयाने आज निकाल दिला.
बैलगाडा मालक , शौकीन , बैलगाडा प्रेमी यांच्यासह मराठी माती आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निकालाबद्दल मी तमाम बैलगाडा मालकांचे, शौकिनांचे, प्रेमींचे मनापासून अभिनंदन करतो. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिलजी केदार व राज्य सरकार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
बैलगाडा शैर्यतीसंबंधी त्यांची भेट घेतल्यापासून माननीय पशुसंवर्धन मंत्री व महाराष्ट्र सरकारने मोठ्या तडफेने न्यायालयात बाजू मांडली आणि त्यामुळेच आज हा निर्णय आपल्या बाजूने लागला आहे असे मी प्रामाणिकपणे नमूद करतो.
वेळोवेळी यासंदर्भात आवाज उठवणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील या सर्वांचेही मनापासून आभार. यासोबतच सर्वसामान्य जनतेने देखील याबद्दल संयम दाखवित शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. वेळोवेळी या लढ्याला ताकद देण्याचं काम केलं याबद्दल त्यांचेही आभार.
पण आजचा विजय हा अंतिम नाही याचीही जाणीव मी सर्वांना करून देऊ इच्छितो. द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला आजचा निर्णय ५ सदस्यीय खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होईपर्यंत लागू असेल. तामिळनाडू, कर्नाटक या इतर राज्यांसमवेत महाराष्ट्राच्या याचिकेची एकत्रित सुनावणी ही ५ सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.
त्यासाठी लागणाऱ्या न्यायालयीन तसेच संसदीय प्रक्रियेची तयारी आपण अव्याहतपणे सुरु ठेवणार आहोत जेणेकरून आजचा मिळालेला तात्पुरता दिलासा आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. यासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे मी कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे. म्हणूनच ही शर्यत देखील आपणच जिंकू याचा विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार…!.