पुणे – स्मार्टसिटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीयपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावरून बदली झाल्यानंतर जगताप हे गेली आठ महिने नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर शासनाने त्यांच्याकडे पीएमपीचा कारभार दिला आहे.
भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागाचे (आयडीईस) अधिकारी असून ते 2012 पासून राज्यशासनाकडे प्रतिनियुक्तीवर राज्यात बदली होऊन आले होते. त्यानंतर त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांची बदली झाल्यानंतर लॉकडाऊन मध्ये त्यांची नियुक्ती झालेली नव्हती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीएच्या आयुक्तपदी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अखेर त्यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीच्या सीईओपदाच्या त्यांच्या कालावधीत पुणे स्मार्ट सिटीला केंद्राचे सर्वाधिक पुरस्कार मिळाले होते, तसेच पीएमपीला ई-बस देण्यासाठीही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.